या वर्षी पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या गौरवशाली प्रवासाला पंचाहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत. या अमृत महोत्सव वर्षात आपण त्यांच्या कार्याला व दृष्टीला सन्मानपूर्वक वंदन करीत आहोत.

दर्पण विषयक माहिती

*दर्पण* संस्थेचे स्वतःचे एक मुखपत्र असावे असा विचार गेली अनेक वर्षांपासून डॉ.व्यंकटेश काब्दे यांच्या मनात रवंथ घालत होता. उपाध्यक्ष सीए डॉ. प्रवीण पाटील यांनी तो विचार शिरसावंद्य मानून राहुल गोरे या शिलेदाराची, या मुखपत्राच्या मुख्य संपादक पदी निवड केली. राहुल गोरे ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहेत. हे मुखपत्र *" नां.ए.सो. दर्पण "* या नावाने त्रैमासिक रुपात प्रकाशित होते. < *दर्पण नाव देण्यामागील भूमिका म्हणजे* -

१)हे मुखपत्र म्हणजे संस्थेच्या कार्याचा आरसा आहे. 
२) हे  संस्थेच्या घडामोडींचा लेखाजोखा आहे. 
३) संस्थेने जोपासलेली ही एक सामाजिक बांधिलकी आहे.
४) संस्थेचे हे एक महत्त्वाचे दस्तावेज आहे. 
५) संस्थेचा हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे.
६) दर्पण हे एक व्यासपीठ आहे. 
७) दर्पण हे एक स्वप्न आहे. 
८) हे एक आव्हान आहे. 
९)  ही एक स्वीकारलेली जबाबदारी आहे. 
१०) दर्पण एक सिंहावलोकन आहे.
याचा पहिला अंक १७ सप्टेंबर २०२१ रोजी , पीपल्स महाविद्यालयाच्या नरहर कुरुंदकर सभागृहात एका भव्य समारंभात प्रकाशित झाला. तीन महिन्याला एक याप्रमाणे वर्षातून चार अंक प्रकाशित करणे असे लक्ष समोर ठेवून वाटचाल सुरू आहे. आजपर्यंत दर्पणचे एकूण १३ अंक प्रकाशित झाले आहेत. नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवानिमित्त दर्पण एक विशेषांक काढत आहे.

*काही निवडक अभिप्राय*


नांदेड एज्युकेशन सोसायटीचे हे मुखपत्र म्हणजे अनोखा उपक्रम राहणार आहे. सात दशकांच्या अस्तित्व काळात संस्थेने पाहिलेले स्वप्ने, त्यातील प्रत्यक्षात आलेल्या बाबी व उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी चाललेली धडपड यांचे वस्तुनिष्ठ व मनोज्ञ दर्शन या छोट्याशा अंकातून घडणार आहे. - डॉ. व्यंकटेश काब्दे (अध्यक्ष - नां.ए.सो.नांदेड.)


'दर्पण' हे त्रैमासिक आपणाला संस्थेत घडणाऱ्या घडामोडींची माहिती उपलब्ध करून देत असते. दर्पणच्या माध्यमातून संस्थेच्या सदस्यांशी सातत्याने संवाद साधला जातो. - सीए. डॉ. प्रवीण पाटील (उपाध्यक्ष - नां.ए.सो. नांदेड.)


नांदेड एज्युकेशन सोसायटीचे एक मुखपत्र असावे व त्याच्या माध्यमातून संवाद साधता यावा, हे कित्येक दिवसांची स्वप्न आता साकार झाले, स्थिरावले आहे‌. - सौ. श्यामल पत्की ( सचिव - नां.ए.सो. नांदेड.)


आपल्या संस्थेमध्ये सुरू असलेले नवीन उपक्रम काय चालू आहेत याची सर्वांना माहिती मिळावी यासाठी चार वर्षांपूर्वी दर्पण नावाने त्रैमासिक पत्रिका काढली गेली, ज्यामुळे सर्व सभासदापर्यंत संस्थेची माहिती दर्पणच्या माध्यमातून देण्यात येते. - ॲड. प्रफुल अग्रवाल (सहसचिव - नां.ए.सो.नांदेड.)


महाराष्ट्रात अनेक शिक्षण संस्था विविध ध्येयाने स्थापन झाल्या आहेत; परंतु स्थापना करतेवेळी ठरविलेले ध्येय साध्य झाले किंवा नाही याचा लेखाजोखा पाहण्यास मिळत नाही. पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांनी २६ जून १९५० रोजी नांदेड एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. ही शिक्षण संस्था विशिष्ट ध्येयातून निर्माण झालेली आहे. या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी आपण केलेल्या कार्याचा लेखाजोखा समाज आणि संस्थेचे सदस्य यांच्यापुढे ठेवण्यासाठी नांदेड एज्युकेशन सोसायटीचे मुखपत्र असावे असा विचार व्यक्त केला. त्यानुसार नांएसो दर्पण हे त्रैमासिक चालविले जाते. एखादी शिक्षण संस्था चालवत असताना आपण कुठपर्यंत आलेलो आहोत? आपणास काय साध्य करायचे आहे? आपली ध्येयपूर्ती झाली किंवा नाही? अशा प्रकारचे मूल्यमापन आपण स्वतः करणे आवश्यक असते. या अनुषंगाने नांदेड एज्युकेशन सोसायटीचे 'दर्पण' हे त्रैमासिक अतिशय महत्त्वाचे आहे. श्री राहुल गोरे दर्पणचे संपादक म्हणून काम पाहत आहेत. ध्येयनिष्ठ वाटचालीचा लेखाजोखा म्हणजेच नांएसो दर्पण. प्रा.डॉ. विकास सुकाळे (अर्थशास्त्र विभाग प्रमुख, पीपल्स कॉलेज, नांदेड.)


नांदेड एज्युकेशन सोसायटीने सुरू केलेला 'दर्पण' हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून संस्थेतील शैक्षणिक विकासाला निश्चितच गती देणारा आहे, यात शंका नाही. हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केल्याबद्दल संस्थेचे सर्व पदाधिकारी व संपादक व मंडळाचे मनःपूर्वक अभिनंदन. आपली संस्था आणि तिच्या अंतर्गत येणाऱ्या तिन्ही घटक संस्थांमध्ये जे शैक्षणिक उपक्रम राबविले जात आहेत, त्यांची माहिती दर्पणच्या माध्यमातून समाजाला होऊन लोकांमध्ये त्यांच्याबद्दलची वस्तुनिष्ठ प्रतिमा तयार होण्यास मदत तर होतेच पण त्याचबरोबर संस्थेचे पदाधिकारी, घटक संस्थांचे प्रमुख, शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या कामात अधिक पारदर्शकता येऊन त्यांच्यातील उत्तरदायित्वाची जाणीव प्रखर होण्यास मदत होईल असे मला वाटते. - व्ही.एन. इंगोले (माजी प्राचार्य - पीपल्स कॉलेज, नांदेड.)